पुन्हा उधळला दोन बालविवाहाचा घाट Ø चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कार्यवाही

पुन्हा उधळला दोन बालविवाहाचा घाट

Ø चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कार्यवाही

चंद्रपूर, दि. 7 : पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश प्राप्त झाले. विशेष म्हणजे जिवती तालुक्यातील 5 बालविवाह यावर्षी यंत्रणेनी थांबविले आहे.

चंद्रपूरपासून दूर अंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईन च्या 1098 क्रमांकावर मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम दोनही बालिका अल्पवयीन असल्याचा पुरावा सहाय्यक संरक्षण अधिकारी परविन शेख, अंगणवाडी सेविका व सुपरवायजर यांच्या मदतीने प्राप्त करण्यात आला. यानंतर चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी दोन्ही बालिकेच्या बालविवाह होत असलेल्या गावात पोहचले व ग्रामीण बाल संरक्षण समिती सदस्यांच्या मदतीने दोन्ही बालविवाह थांबविले.

दोन्ही अल्पवयीन बालिकांच्या कुटुंबाकडून बालविवाह करणार नसल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात आले. या संपूर्ण कारवाही दरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड हेल्पलाईनचे अभिषेक मोहुर्ले, प्रकल्प समन्वयक प्रदिप वैरागडे, सुपरवायझर अंकुश उराडे,  किरण बोहरा आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या हर्षा वऱ्हाटे  यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.