रामपूर गावात डेंग्यू सर्व्हेक्षणव्दारा नागरीकांची तपासणी

रामपूर गावात डेंग्यू सर्व्हेक्षणव्दारा नागरीकांची तपासणी

गडचिरोली,दि.28 : चामोर्शी तालुक्यातील रामपूर गावामध्ये दिनांक २३ मे २०२४ ला डेंग्यू संशयीत रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाव्दारे गावात डेंग्यू आजाराकरीता स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांव्दारे गृहभेटीचे नियोजन करून गावात डेंग्यू सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात आली. सदर सर्व्हेक्षणाव्दारे डेंग्यू संशयीत रुग्णांचे रक्त नमूने संकलन करून ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे तपासणी केली असता २७ मे २०२४ अखेर १८ रुग्ण डेंग्यू NS1 तपासणीत दुषीत आढळून आले आहेत.
रामपुर गावात दिनांक २६ मे २०२४ रोजी एक वयोवृद्ध वय ८२ वर्षे व्यक्तीचा दुर्धर आजाराने मृत्यु झालेला असुन त्या रुग्णाला डेंग्युची कोणतीही लक्षणे आढळुन आली नाहीत. त्या मृत व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच दोन वर्षापुर्विपासून पक्षाघाताने अंथरुनाला खिळून होता.
रामपूर गावात डेंग्यू आजाराची वाढ त्वरीत रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना आरोग्य विभागामार्फत सुरु आहेत. रामपुर गावात आरोग्य विभागामार्फत पथक तयार करुन दैनदिन डेंग्यू संशयीत रुग्ण सर्वेक्षण तसेच कंटेनर सर्व्हेक्षणाचे कार्य सूरु असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली.
गावात आढळून आलेल्या डासोउत्पत्ती स्थानांत तसेच शेततळयात तसेच कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी व सार्वजनिक निरुपयोगी विहीरीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही सुरु आहे. गृहभेटीव्दारे घराच्या छतावर आढळलेले फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी ईत्यादीची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच संडासच्या व्हेंट पाईपला जाळी कापड बांधण्यात आले. सर्व्हेक्षणादरम्यान आढळलेल्या डासोत्पत्ती स्थानात टेमिफॉस अळीनाशक फवारणी करण्यात आली. डेंग्यू व हिवताप आजाराचे रुग्ण वाढू नये याकरीता आरोग्य प्रशासनाव्दारे गावात फवारणी पथक तैनात करून सदर कर्मचाऱ्याव्दारे फॉगींग मशीनच्या साहयने Pyrethrum किटकनाशक फवारणी सलग ३ दिवस केल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ लोकेशकुमार कोटवार यांनी दिली. डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याव्दारे प्रभावी नियमित डास अळी सर्वेक्षण, तपासणी, उपचार, एकात्मिक किटक व्यवस्थापन व लोकसहभाग प्राप्त करून घेण्यासाठी गावात जनजागृती करण्यात येत आहे.
कार्यक्षेत्रात बांधकाम होत असलेल्या परिसरात पाणी साचून डासोत्पत्ती होणार नाही याबाबत ग्राम प्रशासनास निर्देश देण्यात आले. ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील पाण्याकरीता ठेवण्यात येणारे साठ्यामध्ये डासाच्या अळया तयार होण्याची शक्यता असल्याने त्यांना ग्राम पंचायततर्फे पाण्याच्या साठे झाकुन ठेवण्याबाबत व त्याची योग्य निगा राखण्याबाबत कार्यवाही करीता कळविण्यात आले. कार्यक्षेत्रातील निरुपयोगी प्लॉस्टिकच्या वस्तू यात पाणी साचून डास अळी तयार होत असल्याने या निरुपयोगी वस्तूची आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत योग्य विल्हेवाट लावण्यात येत आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.