आधारकार्ड अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन
Ø दिव्यांग व अंध नागरीकांनीही आधारकार्ड अद्ययावत करावे
चंद्रपूर : विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज असून त्याचे अद्यावतीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारकार्डचे बायोमेट्रीक अद्ययावतीकरण करून घ्यावे. तसेच दिव्यांग आणि अंध नागरिकांनीही आधारकार्ड अद्ययावत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय आधार नियंत्रण समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत जिल्ह्यातील आधारकार्ड वितरण व दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला. वय 0 ते 5 वर्ष व 5 ते 15 वर्ष गटातील बालकांचे आधार अद्ययावतीकरण करण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ मिळण्यासाठी, स्पर्धा परीक्षा अर्ज भरणे व शिष्यवृत्ती आदी बाबींकरीता आधारकार्ड आवश्यक दस्तऐवज आहे.
त्याकरिता जवळच्या शासकीय कार्यालय (पंचायत समिती, तहसिल कार्यालय, मनपा/ नगर परिषद नगर पंचायत इतर) बँक किंवा पोस्ट ऑफीस येथे उभारलेल्या आधार केंद्रावर जावून आधारकार्ड अद्ययावतीकरण करुन घ्यावे. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग व अंध नागरिकांनीसुध्दा कोणत्याही शासकीय योजनेकरिता केवायसी करावयाचे असल्यास त्यांनी सदर केवायी ही एम-आधार ॲप द्वारे किवा ई-आधारद्वारे करावी, जेणेकरून अद्ययावत आधारकार्डमुळे सर्व शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळू शकेल, असे आवाहन जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.