खरीप हंगामात पिक प्रात्यक्षिके व बियाणे वितरण कार्यक्रम आयोजन

खरीप हंगामात पिक प्रात्यक्षिके व बियाणे वितरण कार्यक्रम आयोजन

           भंडारा,दि.20 : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके अंतर्गत खरीप हंगामात शेतक-यांचे उत्पनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कृषि विभागा मार्फत पिक प्रात्याक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण या बाबी महाडीबीटी व्दारे राबविण्यात येत आहे. पिक प्रात्याक्षिके अंतर्गत सुधारित तंत्रज्ञानावर आधारित व आंतरपिक पिक प्रात्यक्षिके करीता हेक्टरी रू.9000/- तसेच पीक पध्दतीवर आधारित पीक प्रात्यक्षिके करीता हेक्टरी रू.15000/- अनूदान देय आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके  अंतर्गत भात व कडधान्य अंतर्गत– भात आणि तुर तसेच आंतरपिक पिक पद्धतीवर आधारित प्रात्याक्षिके मधील तुर+सोयाबिन पिक     प्रात्यक्षिके राबविण्याकरिता एका गावातून किमान 25 शेतक-यांचे अर्ज महाडीबीटीवर असणे अनिवार्य आहे.

            प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत शेतक-यांना कृषि केंद्रा मार्फत अनूदानावर भात करीता अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण (10 वर्षा आतील बियाणे) किंमतीच्या 50% किंवा रू. 2000/- प्रती क्वि. तसेच अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण (10 वर्षा वरील बियाणे) किंमतीच्या 50% किंवा रू. 1000/- प्रती क्वि. तसेच कडधान्य अंतर्गत तुर करीता अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण (10 वर्षा आतील बियाणे) किंमतीच्या 50% किंवा रू. 5000/- प्रती क्वि. तसेच अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण (10 वर्षा वरील बियाणे) किंमतीच्या 50% किंवा रू. 2500/- प्रती क्वि. याप्रमाणे अनूदान देय आहे.

                  सन 2024-25 अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पिक प्रात्याक्षिके बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज मागिविण्यात येत आहे. पिक प्रात्याक्षिके वैकक्तिक शेतकरी,गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करतांना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करुन नोंदणी करावी लागणार आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके कार्यक्रम जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो. यात भात, कडधान्य पिकामध्ये भात,तुर व आंतरपिक तुर+सोयाबिन यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांची निवड महाडिबिटी प्रणालीव्दारे ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी महाडिबिटी पोर्टलव्दारे साईट https:// mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगीता माने यांनी कळविले आहे.