जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा Ø तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

Ø तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 14 : भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक मंजुषा भोसले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता पद्माकर पाटील, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) ए.ए. तांदळे, तहसीलदार (सामान्य) प्रिया कवळे आदी उपस्थित होते.

      यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी प्रत्येक विभागाने व्हिजिलन्स (सतर्कता) अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. भ्रष्टाचाराशी संबंधित प्राप्त तक्रारी किती व किती तक्रारींचा निपटारा झाला, याबाबत अहवाल सादर करावा. तसेच भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करावयाची असल्यास संबंधित विभाग किंवा समितीसमोर तक्रार दाखल करावी. तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. भ्रष्टाचारासंदर्भातील जी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविले जाऊ शकतात, अशा प्रकरणांची तसेच गतवर्षी दोषी ठरलेले आणि निर्दोष सुटलेल्या प्रकरणांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर करावी. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक मंजुषा भोसले यांनी पंच नेमणुकीसाठी नोडल अधिका-यांची मागणी प्रशासनाकडे केली.