चामोर्शी आणि आष्टी पोलीसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात केला देशी व विदेशी दारुसह एकूण २६,७५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
• आचार संहितेच्या कालावधीत १६ मार्च ते आजपावेतो एकुण १.८२ कोटी रु. दारू व मुद्देमाल जप्त
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सा. यांचे अवैध दारु विक्री करणाऱ्यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक ०९/०५/२०२४ रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे मोकळ्या जागेत रोडवर एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्र. एम.एच ३१ सी.पी. ३८२६ ही देशी विदेशी दारुच्या पेट्यांनी भरुन ठेवण्यात आली आहे. अशी गोपनिय बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी तत्कालीन प्रभारी अधिकारी पोउपनि. बालाजी लोसरवार यांच्या नेतृत्वात पोउपनि. दुर्योधन राठोड, मपोउपनि. राधा शिंदे, चापोना/मनोज सिंधराम व मपोना/ताडाम सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच मोकळ्या जागेत रोडवर एका पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन दिसुन आल्याने जवळ जाऊन पाहिले असता, सदर वाहनाजवळ असलेले दोन इसम पोस्टे स्टाफला पाहून पळून गेले.
त्यानंतर सदर वाहनाची पाहणी केली असता, वाहनात मध्यभागी तीन खाकि रंगाच्या खरडा बॉक्समध्ये प्रत्येकी १०० प्रमाणे ९० एम.एल. मापाच्या एकुण ३०० नग विदेशी दारुच्या काचेच्या सिलबंद निपा, प्रति निप अवैध विक्री किंमत १५०/- प्रमाणे ४५,०००/- चा मुद्देमाल, मागच्या सिटवर ३८ खाकि खरड्याचे बॉक्स प्रति बॉक्स १०० निपा प्रमाणे ९० एम.एल. मापाच्या एकुण ३८०० नग देशी दारु संत्राच्या प्लॅस्टिक सिलबंद निपा, प्रति निप अवैध विक्री किंमत ८०/- प्रमाणे एकुण ३,०४,०००/- चा मुद्देमाल तसेच विदेशी व देशी दारु वाहतुक करण्याकरीता वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची चारचाकी वाहन क्र. एम एच ३१ सी पी ३८२६ जुनी अंदाजे किंमत ४,००,०००/- रुपये असा एकुण ७,४९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात अज्ञात दोन इसम हे घटनास्थळावरुन फरार झालेले असल्याचे दिसुन आल्याने पोलीस स्टेशन चामोर्शी येथे सदर अज्ञात चालक मालकाविरुद्ध कलम ६५ (अ), ९८, ८३ म.दा.का. अन्वये पोस्टे चामोर्शी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्यातील पुढील तपास मपोउपनि. राधा शिंदे करीत आहेत.
यासोबतच दिनांक १०/०५/२०२४ रोजी पोलीस स्टेशन आष्टी हद्दीमध्ये गोंडपिपरीकडून घाटकूर
मार्गाने आष्टीकडे एका चारचाकी वाहनाने दारुची वाहतुक होणार आहे. अशा पोलीस स्टेशन आष्टीचे
प्रभारी अधिकारी श्री. विशाल काळे यांना मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन पोउपनि. दयाल व पोस्टे
स्टाफ हे आष्टी येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयाजवळ योग्य बॅरेकेटींग करुन रस्त्याच्या
कडेला दबा धरुन बसले. तेव्हा एक चारचाकी वाहन संशयास्पदरित्या येतांना दिसुन आल्याने सदर
वाहनास पोस्टे स्टाफ यांनी हात दाखवुन व लाल बॅटन दाखवुन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, सदर
वाहन चालक यांनी संगनमत करुन आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन बॅरेकेटींगला धडम
मारुन पोस्टे स्टाफ ला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन आणत चामोर्शी मार्गाने पळून
जाताना दिसून आले. तेव्हा चामोर्शी मार्गाने सदर वाहनाचा पाठलाग करीत असतांना याबाबत चामोर्शी
प्रभारी अधिकारी यांनी सदर संशयास्पद वाहनाबाबत माहिती दिली असता, पोस्टे चामोर्शी स्टाफ यांचे
कडुन सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यालय, चामोर्शी जवळील मुख्य सिमेंट रोडवर नाकाबंदी
लावण्यात आली. नाकाबंदीच्या ठिकाणाहून पुढे जाण्यास रस्ता नसल्याने सदर वाहन त्या ठिकाणी
थांबले असता त्यांचा पाठलाग करीत असलेले पोउपनि. दयाल हे आपल्या पोस्टे आष्टी स्टाफ सोबत
नाकाबंदी ठिकाणी पोहचले असता, सदर संशयास्पद वाहनाच्या चालकास त्याचे नाव विचारले, तेव्हा
त्यांनी आपले नाव नितेश वशिष्ट चंदनखेडे, वय ३४ वर्षे, व्यवसाय चालक रा. नागसेन नगर,
भद्रावती, जि. चंद्रपूर व त्यांच्या बाजुला बसून असलेल्या इसमाचे नाव निखील राजु क्षिरसागर वय २१
वर्षे, धंदा-मजूरी रा. गवराळा, गणपती वार्ड, भद्रावती जि. चंद्रपूर असे सांगितले. त्यानंतर पोलीस स्टाफने सदर वाहन चेक केले असता, त्यामध्ये १) ०८ बॉक्समध्ये प्रत्येकी ०२ लिटर मापाच्या इंम्पेरीअल ब्ल्यु कंपनिच्या ०६ बाटल्या असे एकुण ४८ बाटल्या, प्रती बाटल किंमत २०००/- प्रमाणे एकुण ९६,०००/- चा मुद्देमाल, २) खाकी रंगाच्या खर्चाचे ४० बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये ९० एमएल मापाच्या रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या १०० निपा एकुण ४००० निपा, प्रति निप किंमत ८०/- प्रमाणे एकुण ३,२०,०००/- चा मुद्देमाल, दोन नग वापरते जुने विवो कंपनीचे मोबाईल प्रति किंमत ५०००/- प्रमाणे एकुण १०,०००/- चा मुद्देमाल तसेच एक जुनी स्कॉर्पिओ वाहन क्र. एम एच ३२ ए एच५५५६, किंमत अंदाजे १५,००,०००/- असा एकुण १९,२६,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी नामे १) नितेश वशिष्ट चंदनखेडे, २) निखिल राजु क्षिरसागर यांचेविरुद्ध कलम ३०७, ३४ भादंवी, सहकलम ६५ (अ), ८३ म.दा.का., सहकल १८४ मो.वा.का. अन्वये पोस्टे आष्टी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्यातील पुढील तपास पोउपनि. अतुल तराळे करीत आहेत. अशा दोन्ही विभिन्न गुन्ह्यामध्ये चामोर्शी व आष्टी पोलीसांनी देशी व विदेशी दारुसह एकुण २६,७५,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
दि. १६ मार्च २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची आचारसंहिता सुरु झाली. दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाहेरुन येणा-या अवैध दारु वाहतुकीवरती आळा घालण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये आचारसंहिता सुरु झाल्यापासुन ते आजपर्यंत एकुण १.८२ कोटी रुपये किंमतीची देशी/विदेशी दारु व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या कार्यवाह्या मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.