गृह मतदानाबाबत दिव्यांग व वृध्द मतदारांना आनंद
Ø चार दिवसांत 1185 मतदारांनी नोंदविले मत
चंद्रपूर, दि. 12 : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा, 85 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी घरोघरी जात आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृहमतदान करणा-या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे.
‘मी पूर्णपणे दिव्यांग आहे, स्वत:च्या पायावर किंवा कशाचाही आधाराने उभी राहू शकत नाही, त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊ शकत नव्हती, आज प्रशासनाने घरी येऊन मत नोंदविले, याचा अतिशय आनंद आहे’ अशा भावना व्यक्त केल्या महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या दिव्यांग असलेल्या महिलेने.
‘मतदानासाठी लोक घरी आले, आम्ही म्हटलं, बापू मतदानासाठी आम्हाले मतदान केंद्रावर जाता येत नाही, त्यांनी घरी येऊन आमच्या दोघांचे मत घेतलं, आम्हाला आनंद झाला’, असे मत व्यक्त केले नारपठार (विजयगुडा) येथील संग्राम कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृद्ध जोडप्याने. तर खांडरे ले-आऊट, शिवछत्रपती नगर, चंद्रपूर येथील रहिवासी अनंत देविदास कावळे आजोबा म्हणाले, ‘माझे वय 90 च्या वर असून आज घरून मतदान केलं, याचा अतिशय आनंद झाला’.
होय, सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात 8 एप्रिल पासून गृह मतदानाला सुरूवात झाली. आतापर्यंत चार दिवसात एकूण 1185 मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपले मत नोंदविले असून यात 1025 मतदार 85 वर्षांवरील तर 160 मतदार दिव्यांग आहेत.
तालुकानिहाय गृहमतदानाची संख्या : राजुरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले 310 मतदार आणि दिव्यांग 21 असे एकूण 331 मतदारांनी गृहमतदानातून मत नोंदविले आहे. चंद्रपूर मतदारसंघात 85 वर्षांवरील 167, दिव्यांग 15 असे एकूण 182 मतदार, बल्लारपूर मतदारसंघात 85 वर्षांवरील 186, दिव्यांग 56 असे एकूण 242 मतदार, वरोरा मतदारसंघात 85 वर्षांवरील 200, दिव्यांग 39 असे एकूण 239 मतदार, वणी मतदारसंघात 85 वर्षांवरील 89, दिव्यांग 17 असे एकूण 106 मतदार तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 73, दिव्यांग 12 असे एकूण 85 मतदारांनी गृह मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविला.
मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लेरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.