भरती असलेल्या रुग्णांची जिल्हाधिका-यांकडून आस्थेने विचारपूस
Ø बल्लारपूर आणि राजुरा उपजिल्हा रुग्णालयाला भेट
चंद्रपूर, दि. 27 : जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर उपचार व स्थानिक स्तरावरच उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व त्याची अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.27) बल्लारपूर व राजुरा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास भेट देत रुग्णालयातील उपलब्ध आरोग्य सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी उपविभागीय अधिकारी (बल्लारपूर) स्नेहल रहाटे, रवींद्र माने (रविंद्र माने), जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कळसकर बल्लारपूरचे तहसीलदार ओमकार ठाकरे, राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश गौंड आदी उपस्थित होते.
बल्लारपूर व राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील अपघातग्रस्त व उपचार घेत असलेल्या रुग्णांशी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आस्थेने विचारपूस करून संवाद साधला. जेवण वेळेवर मिळते का ? कधी भरती झाले ? कोणता आजार आहे ? असे प्रश्न विचारून लवकर बरे व्हा, असा आशावाद व्यक्त केला. रुग्णांनीसुध्दा जिल्हाधिकारी विन गौडा यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे दिली. यावेळी त्यांनी बल्लारपूर व राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व इंटर्न डॉक्टरांची उपलब्धता, मनुष्यबळ, औषधांचा साठा, उपलब्ध खाटा, डॉक्टरांसाठी निवासव्यवस्था तसेच रुग्णालयाकडून देण्यात येणा-या आरोग्यविषयक सुविधांची माहिती जाणून घेतली.
विविध विभागांची पाहणी : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बल्लारपूर आणि राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभाग, क्ष-किरण विभाग, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, संसर्गजन्य रोग नियंत्रण कक्ष, रुग्ण तपासणी कक्ष, आयुष विभाग, अपघात विभाग स्त्री व पुरुष रुग्ण विभाग, बाल उपचार केंद्र, हिरकणी कक्ष, अलगीकरण कक्ष आदी विभागास भेट देत आरोग्य व्यवस्था व सुविधांची पाहणी केली.