विशेष लेख शासकीय योजना घरोघरी नेणारी विकसीत भारत संकल्प यात्रा

विशेष लेख शासकीय योजना घरोघरी नेणारी विकसीत भारत संकल्प यात्रा

भंडारा दि. 11 : भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहिम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.  मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे.

जनजाती गौरव दिनापासून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या देशातील 110 जिल्ह्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून उर्वरीत सर्व जिल्ह्यात यात्रा सुरू करण्यात आली असून 26 जानेवारीपर्यंत देशातील सर्व भागात पोहोचणार आहे. यात्रेच्या निमित्ताने लाभार्थ्यांशी संवाददेखील साधण्यात येत आहे.

भंडारा जिल्हयात 24 नोव्हेंबर रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरातुन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पाच एलईडी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.नुकतेच मा.राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत आठ डिंसेबरला शहापूर फायर सर्व्हीस ॲकेडमी परिसरात विकसीत भारत संकल्प यात्रा महाशिबीर संपन्न झाले.

ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर या योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.

आदिवासी भागासाठी सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन कार्यक्रम, एकलव्य निवासी शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, वन धन विकास केंद्र आदींबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. तर शहरी भागात प्रधानमंत्री स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना, आयुष्मान भारत, उज्वला योजना, मुद्रा कर्ज, स्वच्छ भारत अभियान (शहरी), पीएम आवास योजना, पीएम ईबस सेवा, खेलो इंडिया, सौभाग्य योजना, वंदे भारत रेल्वे, उडान आदी विविध योजनांच्या जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

माहिती प्रसाराद्वारे शासकीय योजनांबाबत जागरुकता निर्माण करण्यासोबतच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीदेखील यात्रेदरम्यान होत असल्याने या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विविध योजनांची माहिती देणारा दृकश्राव्य माध्यमाने सज्ज चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नागरिकांशी संवाद साधतांना त्यांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेशही दाखविण्यात येत आहे. यात्रेला भेट देणारे नागरिक शपथ घेऊन विकसित भारतासाठी संकल्प करीत आहेत.

नुकतेच भंडारा तालुक्यातील गुंथारा गावात शेतकऱ्यांसाठी केंद्रीय उपसचिवांच्या उपस्थितीत नॅनो फवारणीचे ड्रोन प्रात्यक्षिक  करण्यात आले .एकुण जिल्हाभरात 44 ड्रोन प्रात्यक्षिके करण्यात आली.पत्रिकेवरील चर्चा ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरत आहे. स्थानिक पातळीवर यश संपादन केलेल्या महिला आणि खेळाडूंचा सत्कार हेदेखील या यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. यात्रेदरम्यान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि किसान क्रेडीट कार्ड नोंदणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 140 पेक्षा अधिक ग्रामपंचायती ही यात्रा पोहोचली. नागरिकांचा यात्रेला चांगला प्रतिसाद असून आतापर्यंत 12 हजाराहून अधिक नागरिकांनी यात्रेला भेट दिली. नागरिकांना विविध योजनांचा लाभदेखील देण्यात आला. या यात्रेला भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. देशाच्या विकासाचा संकल्प घेऊन ही यात्रा आपल्या दारापर्यंत येते आहे. आपणही यात्रेचा लाभ घेण्यासाठी अवश्य भेट द्या!

         जिल्हा माहिती कार्यालय,

                 भंडारा