पर्यावरण आणि वनांचे महत्व समजण्यासाठी ‘ताडोबा’ हे चालते बोलते विद्यापीठ– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
Ø ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी तसेच महसूल विभागाच्या वाहनांचा लोकार्पण सोहळा
चंद्रपूर, दि. 2 : आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण तसेच वनांचे महत्व समजण्यासाठी ताडोबा पर्यटन ही महत्वाची बाब झाली असून हे एक चालते – बोलते विद्यापीठच आहे, असे विचार राज्याचे वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारीकरीता पर्यटन वाहनांचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ताडोबा अंधारी प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., राहूल पावडे, देवराव भोंगळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
गतवर्षी देश-विदेशातील जवळपास 3 लाखांच्या वर पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी आले, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा प्रकल्पातील सोयीसुविधा उत्तम व्हाव्यात, यादृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले असून सिंगापूरच्या आर्किटेक्चरला डिझाईन बनविण्याचे काम देण्यात आले आहे. देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात सुंदर टायगर सफारी ताडोबाची राहील, यासाठी आपण प्रयत्नशील आहो. अतिशय महत्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यामुळे टायगर सफारीकरीता गाड्या टप्प्याटप्प्याने बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिल्या टप्पात आज सहा गाड्यांचे लोकार्पण होत आहे, असे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र पर्यटनाचा आनंद मिळणार : चंद्रपूर जिल्ह्यात राहणा-या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांनाही ताडोबाची व्याघ्र सफारी व्हावी, त्यांना वनांचे निरीक्षण जवळून करता यावे तसेच पर्यावरणाचा अभ्यास व्हावा, यासाठी जिल्ह्यातील 7500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ‘चला जाणूया वनाला’ या उपक्रमांतर्गत मोफत वनपर्यटन, व्याघ्र दर्शन घडविण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना ताडोबासह राज्यातील इतर अभयारण्यात वन व वाघ्र पर्यटनाचे मोफत नियोजन करण्यात येणार आहे,
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नवीन क्रुझर वाहनांसाठी 92 लक्ष 79 हजार रुपयांचा निधी : ताडोबा वन्यजीव कोअर विभागात जिप्सी व कॅन्टर वाहनाद्वारे पर्यटक सफारीचा आनंद घेतात. कोअर विभागातील बरेच रस्ते एकेरी व छोटे असल्याने कॅन्टर वाहन जाण्यास अडचण निर्माण होते. तसेच या वाहनांच्या आवाजामुळे इतर पर्यटकांना त्रास होतो. त्यामुळे कँटरद्वारे सफारी करणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार पर्यटनाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने नऊ आसनाचे क्रुझर पर्यटन वाहन सुरू करण्याची संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. यासाठी जिल्हा वार्षिक योजना (2022-23) नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत क्रुझर वाहन खरेदी करण्यासाठी 92 लक्ष 79 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त झाला.
नवीन क्रझर वाहनात जंगल सफारीच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यात आले आहेत. ही वाहने मोहर्ली गेटवरून पर्यटकांसाठी नियमीत उपलब्ध राहतील. या वाहनांसाठी बुकींग व्यवस्था पूर्वीप्रमाणेच बुकींग मशीनद्वारे क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयात उपलब्ध राहील.
महसूल विभागासाठी 10 नवीन बोलेरो : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतीमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासाठी 10 नवीन बोलेरो गाड्यांचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.