तृतीयपंथीयांसह दुर्लक्षित घटकांसाठी २ व ३ डिसेंबरला मतदारनोंदणी शिबिर
भंडारा,दि.30 : मा.भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी, २०२४ या अर्हता तारखेवर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून तृतीयपंथीय, देह व्यवसाय करणाऱ्या, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातींच्या दुर्लक्षित घटकातील व्यक्तींसाठी २ व ३ डिसेंबरला विशेष शिबिर प्रत्येक मतदान केंद्रावर होत आहे. या कालावधीत संबंधित यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांना मदत करण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित राहतील. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन निवडणूक विभागास सहकार्य करावे,
ज्या व्यक्तीचे १ जानेवारी, २०२४ ला वयाची १८ वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु मतदार यादीत नाव नाही, अशा व्यक्तीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन घेण्यासाठी फॉर्म नमुना ६ भरुन द्यावा. अर्हता दिनांकाला १८ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या मतदाराचे नाव त्या अर्हता तारखेला मतदार यादीमध्ये समाविष्ट केले जाईल. https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर अथवा Voter Help line App द्वारे सुध्दा मतदार नाव नोंदणी करावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.