गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्ज मंजूर करून देण्याच्या कोणत्याही अमिषास बळी पडू नये
भंडारा, दि.28: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत खंडित कालावधी 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 मधील जिल्ह्यातील एकूण 94 प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले. त्यापैकी 84 प्रस्ताव मंजूर होऊन 83 प्रस्तावांचा निधी जिल्हास्तरावर प्राप्त झालेला आहे.
जिल्ह्यात काही बिगर शासकीय व्यक्ती शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करून अर्ज मंजूर करून आणण्याची हमी देतात. तरी सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, सदर योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येते असून अर्ज करणे, अर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रिया दरम्यान कोणत्याही बिगर शासकीय व्यक्तीचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज मंजूर करून देण्याच्या कोणत्याही अमिषास बळी न पडता कृषी विभागाचे मागदर्शन घेऊन योजनेत अर्ज करावा. त्यासाठी कोणतीही फी अदा करू नये. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती संगिता माने यांनी कळविले आहे.
सन 2023-24 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू झालेली आहे. अपघात ग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे वारसदार यांनी अनुदानाचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 30 दिवसात सादर करावा. प्रस्ताव तयार करताना येणाऱ्या अडचणी विषयी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा शेतकरी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची मदत घ्यावी.
अपघातग्रस्त शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे आठ दिवसात सादर करतात. तालुका कृषी अधिकारीयांच्याकडून छाननी झालेल्या प्रस्तावावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये मदत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येतो.