जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा कृषी महोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत आढावा
चंद्रपूर, दि.22 : जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन 3 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत चांदा क्लब गांऊड, चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. याबाबत आयोजनाच्या पुर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पेटे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर, पशुसंवर्धन उपायुक्त श्री.काळे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी विक्की डंभारे तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, कृषी महोत्सव भव्य स्वरूपात पार पडण्यासाठी उत्कृष्ट नियोजन करावे. चांदा क्लब ग्राउंड येथे 350 स्टॉल लावण्याचे प्रस्तावित आहे. त्या ठिकाणी लागणाऱ्या स्टॉलबाबत संबंधित विभागांनी नियोजन करून घ्यावे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सदर महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याने मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्य व्यवसाय विभागाचे स्टॉल उभारावे व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत असणाऱ्या योजनांची माहिती त्या स्टॉलच्या माध्यमातून द्यावी. मार्गदर्शनासाठी कृषी, पशु व मत्स्य संदर्भात चांगले मार्गदर्शक व प्रगतशील शेतकऱ्यांना निमंत्रित करावे. त्यासोबतच विविध कंपन्यांचे स्टॉल लावण्याबाबत संबंधित कंपन्यांना कळवावे. पीएम विश्वकर्मा योजना, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ तसेच जैन इरिगेशन कंपन्यांचे स्टॉल उभारण्यासाठी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील फूड प्रोडूसर कंपनी यांना निमंत्रित करावे. तसेच विविध विभागांनी माहिती पुस्तिकेसह क्यू-आर कोडच्या माध्यमातून योजनांची माहिती उपलब्ध ठेवावी. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती तसेच तेथे येणाऱ्या नागरिकांना त्याच ठिकाणी योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत संबधित यंत्रणाना दिल्या.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बियाणे व खाद्यपदार्थ किट वाटप :
महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ व सहयोगी संस्थेमार्फत आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला. यावेळी वडोली (ता.चंद्रपूर) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे कुटुंबीय रसिका प्रशांत आत्राम यांना प्रातिनिधीक स्वरूपात बियाणे व खाद्यपदार्थ किटचे वाटप करण्यात आले.