पर्यवेक्षिका हेमके यांचे निलंबन न झाल्यास अंगणवाडी सेविका सामूहिक आत्मदहन करणार
◾ मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेसह अनेक अधिकाऱ्यांना दिले निवेदन.
सिंदेवाही :- बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सिंदेवाही अंतर्गत मोहाडी सर्कल मधील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या पर्यवेक्षिका प्रेमिला अरविंद हेमके यांना तात्काळ निलंबित करा. अन्यथा १५ डिसेंबर रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा सर्कल मधील अंगणवाडी सेविकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
सिंदेवाही पंचायत समिती बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अंतर्गत मोहाडी सर्कल मध्ये एकूण २० अंगणवाडी केंद्र असून ३ केंद्रावर सेविका पद रिक्त असून एकूण १८ केंद्रामध्ये ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना असून तो आहार अंगणवाडी सेविका मार्फत लाभार्थीना दिल्या जातो. त्याचे मासिक अनुदान सेविकांना मिळत असते. मात्र मोहाडी सर्कलच्या पर्यवेक्षिका प्रेमिला अरविंद हेमके ह्या मागील अनेक दिवसापासून सेविकाकडून मासिक हप्ता घेत असल्याने सेविकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. काही सेविका पर्यवेक्षिका हेमके यांना हप्ता देत होत्या, तर काही सेविकांनी हप्ता देण्यास विरोध केला. त्यामुळे पर्यवेक्षिका प्रेमीला हेमके यांनी सेविकांना अश्लील शिवीगाळ करणे, त्यांच्या आहाराचे अहवाल वरून लाभार्थी कमी करणे, अहवाल फाडून टाकने, असे कृत्य करून सेविका आणि मदतनीस यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देणे सुरू केले. त्यामुळे पर्यवेक्षिका यांचे जाचाला कंटाळून सर्कल मधील १६ अंगणवाडी सेविका एकत्र येऊन त्यांचेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सामजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गौतम गेडाम यांचे मार्फतीने पर्यवेक्षिका हेमके यांचे विरोधात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करून पर्यवेक्षिका प्रमिला अरविंद हेमके यांना येणाऱ्या १२ डिसेंबर पर्यंत निलंबित करा. अन्यथा १५ डिसेंबर रोजी सर्कल मधील सर्व अंगणवाडी सेविका या सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देऊन निलंबन होई पर्यंत हेमके यांचा मोहाडी सर्कलचा पर्यवेक्षिका प्रभार काढण्यात यावा. अशीही मागणी केली असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पर्यवेक्षिका प्रेमीला हेमके यांचा मुलगा गुंड प्रवृत्तीचा असून आमचे सहकारी गौतम गेडाम यांनी अंगणवाडी सेविकांना मदत का केली. माझ्या विरोधात बातमी का छापली असे म्हणून पर्यवेक्षिका हेमके यांनी आपल्या गुंड प्रवृत्तीच्या मुलाच्या हाताने पत्रकार गौतम गेडाम यांना शोधाशोध करून सिंदेवाही पंचायत समिती कार्यालय जवळ धक्काबुक्की केली असल्याने आम्हा सर्व सेविकांना पर्यवेक्षिका हेमके यांचेकडून भीती निर्माण झाली असल्याची माहिती अन्याग्रस्त सेविकांनी माध्यमांना दिली आहे.