सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहार आवश्यक – संग्राम शिंदे
Ø राष्ट्रीय पोषण माह – 2023
Ø केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचा उपक्रम
चंद्रपूर, दि. 13 : सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात पोषक आहाराचा समावेश करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे यांनी केले.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा तर्फे श्री. जैन सेवा समितीद्वारा संचालित विद्या निकेतन स्कुल, चंद्रपूर येथे दोन दिवस राष्ट्रीय पोषण माह 2023 या विषयावर विशेष प्रचार प्रसार अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या मुख्य समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, विद्या निकेतन स्कुलच्या प्राचार्या राजश्री गोहोकार, सल्लागार श्रीमती बावणी जयकुमार, प्रशासक श्री. जयकुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
कुपोषणाच्या समस्येला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाद्वारे सकस आहाराविषयी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, पोषण आहाराबाबत जनजागृती करण्याकरीता देशात दरवर्षी सप्टेंबर महिण्यात राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात येतो. माता व बालक यांच्या शारिरीक व मानसिक विकासासाठी दररोजच्या आहारात पोषक आहाराची आवश्यकता आहे. जंक फुड टाळून पोषक आहाराचा दररोजच्या जेवणात समावेश केल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण म्हणाल्या, दैनंदिन जीवनात आहार हा महत्वाचा घटक आहे. मानवी शरिराला जन्मापासून पोषक आहाराची आवश्यकता असते. पोषक आहारामुळे केवळ शरीराची वाढच नाहीतर बुध्दीचाही विकास होतो. पोषक आहाराविषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेत एक तासिका घेऊन याबाबत माहिती सांगणे आवश्यक आहे. तरच प्रत्येक घरापर्यंत पोषण आहाराचे महत्व पोहचविणे शक्य होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर म्हणाले, कोरोनानंतर आपण आरोग्याविषयी जागृत झालो आहोत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी पोषण आहार महत्वाचा आहे. पालकांनी मुलांच्या सकस आहाराकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी दोन दिवस घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी व पाककला स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक डेझी इंगळे, द्वितीय हर्षल घुग्गुसकर, तृतीय सांझ देशभ्रतार, प्रोत्साहनपर श्रृतिका चव्हाण, आणि दर्शनी माणूसमारे, रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक सलोनी भुषणवार, द्वितीय तृष्णा लडके, तृतीय रिया बैरकर, प्रोत्साहनपर टिशा वांढरे आणि साक्षी चौबे, तर पाककला स्पर्धेत प्रथम देवयानी आखरे, द्वितीय प्रियानी सातार, तृतीय रूपाली तिवारी, प्रोत्साहनपर पारितोषिक अथर्व कुलकर्णी आणि ओम येरगुडे यांना देण्यात आले.
प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन विद्या निकेतनचे पर्यवेक्षक महेश ताम्हण यांनी केले. तर आभार प्राचार्या राजश्री गोहोकार यांनी मानले. चित्रकला स्पर्धेचे परिक्षक म्हणून अजय शास्त्रकार, रांगोळी स्पर्धेचे परिक्षक म्हणून मोना, तर पाककला स्पर्धेचे परिक्षक म्हणून छाया दुबे व प्रतिभा टोंगे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजश्री गोहोकार, महेश ताम्हण, शुभांगी धारणे, प्रिया गाजरलावार, श्याम जगताप, आशिष पुणेकर यांनी परिश्रम घेतले.