जिल्हाधिकाऱ्यांनी कारागृहास भेट देत बंद्यांच्या सोयी सुविधांची केली पाहणी
Ø जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 10 : चंद्रपूर जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे 8 सप्टेंबर रोजी कारागृह अभिविक्षक मंडळाची माहे जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीची त्रैमासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी, दंडाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव सुमित जोशी, कार्यकारी अभियंता(विद्युत) पूनम वर्मा, निरीक्षक (वेलफेअर) राहुल चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी हेमचंद कन्नाके, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, सा.बां. विभागाचे उपविभागीय अभियंता श्री.अंबुले, परीविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर, उपअभियंता भूषण येरगुडे, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, अशासकीय सदस्य ओमप्रकाश गनोरकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा व इतर सदस्यांनी कारागृहातील पाकगृहास भेट देऊन बंद्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची तसेच बंद्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या अन्नधान्याची धान्य गोदामामध्ये तपासणी केली. त्यानंतर महिला व पुरुष विभागामध्ये जाऊन बंद्यांच्या अडी-अडचणीची विचारणा केली व समस्या निवारण करण्याचे आश्वासन दिले. कारागृहामध्ये तृतीयपंथी बंद्यांकरीता बॅरेकचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून निधी मंजुरीकरीता पाठविणे, त्यासोबतच कारागृह सुरक्षा व सुविधेकरीता कारागृहामध्ये मल्टीपर्पज हॉल, वॉच टॉवर, अतिसुरक्षा कक्षाचे बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या. कारागृह सुरक्षेकरीता कारागृहामध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, वाकी टॉकीज यंत्रणा बसविणे, तसेच मोबाईल जॅमर बसविण्याकरीता वरिष्ठ कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.
अभिविक्षक मंडळाच्या बैठकीत चर्चेनंतर कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी बैठकीचे अध्यक्ष व अभिविक्षीक मंडळातील इतर सदस्यांचे आभार व्यक्त केले.