जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी लाभार्थ्यांना धनादेश वाटप
Ø योजनांच्या जनजागृतीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 09 : आदिवासी विकास विभागातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर येथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील समृद्ध संस्कृतीचा सोहळा, मिलन सांस्कृतिक चिमूर येथे आयोजित करण्यात आला.
चिमूर प्रकल्पांतर्गत येत असलेल्या चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभीड व ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमांमध्ये केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना धनादेश वाटप, प्रकल्पांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, प्रकल्पातंर्गत तालुक्यातील नव्याने शासकीय सेवेत लागलेल्या यशवंत आदिवासी युवक/युवतींचा सत्कार, आदिवासी विकास विभागांतर्गत विविध योजनांची जनजागृती, कृषी विषयक मार्गदर्शन, हस्तकला व पाककला प्रदर्शनी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पारंपारिक आदिवासी नृत्य आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला चिमूरचे गटविकास अधिकारी राठोड, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड, कृषी अधिकारी श्री. कांबळे, नायब तहसीलदार श्री. पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक बेलेकर व नरेंद्र कावळे व आदिवासी सेवकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमांमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले. यावेळी कार्यालय अधीक्षक शरद चौधरी व नरेंद्र पंडित तसेच इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.