जिल्ह्याचा मत्स्य उत्पादन आराखडा तयार होणार
मत्स्य संवर्धन विभागाने केले सादरीकरण
भंडारा दि. 3: जिल्हा विकास आराखड्या अंतर्गत जिल्ह्याची भौगोलिक ओळख असलेल्या तलावांची उपलब्धता व त्या तलावात करण्यात येणाऱ्या मासेमारी व्यवसायातून, मत्स्यसंवर्धनातून मत्स्य उत्पादन मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी पाहता जिल्ह्याचा सर्वसामावेशक असा मत्स्य आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांनी मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उमाकांत सबनिस व त्या विभागाच्या उच्च अधिकारी यांच्याशी चर्चा केली. तसेच या जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन वाढण्यासाठी आणि चांगल्या दर्जाचे बीज येथे निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना संदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेत सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर उपसंचालक सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण डॉ. गिबीन कुमार, संचालक प्रशिक्षण सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण डॉ एस.कांचन, यांनी उत्पादन वाढविण्यासाठी गिफ्ट तिलापीया, पंगॅशियस, झिगा या सारख्या प्रजातीचे बीज वापरुन व त्यासाठी खाद्याचा वापर करुन मत्स्यउत्पादनात वाढण्याबाबत सभेत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे यांनी गोंदिया जिल्ह्याची व भंडारा जिल्ह्याची भौगोलीक परिस्थिती सारखीच असुन मत्स्यव्यवसाय विषयक समस्या सारख्याच असल्याचे सांगितले. गोंदिया जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी खुप वाव असुन गोड्या पाण्यातील झिंगा पालनावर लक्ष केंद्रित करुन मत्स्यउत्पादन वाढविण्याबाबत काय उपाययोजना कराव्यात यावर चर्चा झाली. यावेळी श्री. कुंभेजकर यांनी गोसेखुर्द धरणातील मत्स्यव्यवसायाची माहिती जाणून घेतली.
संचालक प्रशिक्षण सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण डॉ एस.कांचन यांनी क्लस्टर निर्माण करुन व मत्स्यव्यसाय विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांचा घेवुन सविस्तर आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच श्री. कुंभेजकर यांनी सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणमार्फत जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण आयोजीत करण्याबाबत सुचित केले . डॉ एस.कांचन लवकरच प्रशिक्षण आयोजित करणार असल्याचे आश्वत केले. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नागपूर यांनी नागपूर जिल्ह्यातील मत्स्यउत्पादन वाढीबाबतची माहिती दिली.