सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø भविष्यातील संकटासाठी आपत्ती व्यवस्थापन तयार ठेवा

Ø 23 जुलैच्या आढावा बैठकीत अहवाल सादर करण्याच्या सुचना

चंद्रपूर, दि. 20 : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. पुरग्रस्तांना मदत करताना प्रशासनाने नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे. सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या आणि तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश चंद्रपूर,गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि.19) घेतला. मंत्रालयातून दूरदृष्य प्रणालीद्वारे चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली व आवश्यक सूचना केल्या. सर्व सूचनांवर अमलबजावणी करून 23 जुलैला होणाऱ्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ज्या गावांना आणि वस्त्यांना अतिवृष्टीचा फटका बसला तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. पण त्यांना निवारा शिबिरात पायाभूत सुविधांची कमतरता राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच इरई व झरपट नदीच्या खोलीकरणाच्या संदर्भात व इरई नदीला संरक्षक भिंत बांधण्याच्या प्रस्तावावर अभ्यास करून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

 

जिल्ह्यातील नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करावी आणि त्यांच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यासोबतच भविष्यात असे संकट पुन्हा आले तर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन तयार ठेवा. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामग्री अद्ययावत ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

 

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे (गोंदिया), मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ.मंगेश गुलवाडे, प्रमोद कडू, ब्रिजभूषण पाझारे, राम लाखीया, डॉ.भगवान गायकवाड, नरेंद्र जिवतोडे, प्रवीण ठेंगणे यांची उपस्थिती होती.

 

मदत कार्य करण्याचे आदेश : चंद्रपूर शहरात एका दिवसातील अतिवृष्टीमुळे 240 मिलीमीटर पाऊस पडला. यात 320 घरांमध्ये पाणी शिरले. चंद्रपूर शहरात एका घराचे पूर्ण नुकसान झाले असून 47 घरांचे किरकोळ नुकसान झालेले आहे. तर आतापर्यंत 1 जूनपासून झालेल्या पावसामुळे 804 घरांचे नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामे तातडीने करून मदतकार्य करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच पाऊस आल्यानंतर काही दिवसांनी घर पडल्यास त्याचाही पंचनामा करून मदत करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या.

 

गोंदियातील परिस्थिती नियंत्रणात : गोंदिया जिल्ह्यात जूनपासून 119 टक्के पाऊस झालेला असला तरीही पूर परिस्थितीसारखे संकट उद्भवलेले नाही. पण वेळ आल्यास आपत्ती व्यवस्थापन तयार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मात्र गाफील न राहता संपूर्ण व्यवस्था, संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्याचे आदेश पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी दिले.