चंद्रपुरातील १०० कलावंतांचा नागपुरात ‘गर्जा महाराष्ट्र’
नागपूर – स्पार्क जनविकास फाउंडेशन द्वारा चंद्रपुरातील जवळपास १०० कलावंतांनी साकारलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राच्या पारंपारिक संस्कृतीवर आधारित नाटकाचा प्रयोग नुकताच नागपुरात पार पडला.
‘वाईस ऑफ मीडिया’ या देशव्यापी पत्रकार संघटनेच्या विदर्भ विभाग अधिवेशनाचे औचित्य साधून विदर्भातील ११ जिल्ह्यातील पत्रकारांसमोर किंग्स वे ऑडिटोरियम (परवाना भवन) येथे रविवारी हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
जवळपास ६०० पत्रकारांच्या उपस्थितीत हा प्रयोग यशस्वीपणे पार पडला असून पत्रकारांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यातील पत्रकार व्हॉइस ऑफ मीडियाच्या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते.
लोकमत युवा मंच मध्ये सन २००२ पर्यंत एकत्र काम केलेली तरुणाई तब्बल वीस वर्षानंतर २०२३ मध्ये गडचिरोली येथे स्नेहमिलनाच्या माध्यमातून कुटुंबासह एकत्र आली. सन २००२ मध्ये असणारा तोच उत्साह घेऊन नव्या तरुणाईला साद घालून नव्या कलाकारांना राज्यपातळीवर मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ आहे.
स्पार्क जनविकास फाउंडेशनचे संचालक आनंद आंबेकर यांच्या संकल्पनेतून वीस वर्षांपूर्वी साकारलेला गर्जा महाराष्ट्र माझा आज नव्या रूपात नवख्या कलाकारांसह संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी सज्ज आहे.
महाराष्ट्राचे राहणीमान, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातील सण, उत्सव, भारुड, फुगडी, गणपती उत्सव, संत परंपरा, शेतकऱ्यांचा सण पोळा, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा यासह महाराष्ट्रात वर्षभर होणाऱ्या पारंपारिक उत्सवांची प्रत्यक्ष अनुभूती अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम गर्जा महाराष्ट्र माझा या नाटकाच्या माध्यमातून होत आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक बालकांनी, युवक-युवतींनी, प्रौढांनी, वृद्धांनी बघावी अशी ही कलाकृती अवघा महाराष्ट्र गाजवेल यात शंका नाही.