आपत्ती व्यवस्थापनासाठी तीनशे आपदा मित्रांना प्रशिक्षण
प्रशिक्षणाचा समारोप
भंडारा, दि. 13 : पावसाळयापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून जिल्हयात तीनशे आपदा मित्र/ सखींना रावणवाडी येथे आयोजित निवासी पाच दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. आपदा मित्र जिल्ह्यातील विविध गावांमधून असून त्यांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र व आपत्तीच्या काळात उपयोगी असणाऱ्या किटचे वितरण यावेळी करण्यात आले.
या प्रशिक्षणाचा नुकताच समारोप झाला .या कार्यक्रमाला जिल्हाधिका-यांनी देखील भेट दिली. देशात, राज्यात किंवा जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीमध्ये फक्त प्रशासनाचा सहभाग मर्यादित न ठेवता समाजातील घटकांचा सहभाग आवश्यक आहे. कुठल्याही आपत्ती किंवा संकटांना सामोरे जातांना कौशल्याचा पुरेपूर फायदा होतो. आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण घेतलेल्या आपदा मित्र व सखींचे काम आज खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. तसेच या प्रशिक्षणाचा लाभ इतरांना सुध्दा द्यावा व समाजामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी केले.
प्रशिक्षणामुळे मनोबल व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर पुढे म्हणाले, नियोजनबद्ध पध्दतीने प्रत्येक गावात आपदा मित्र तयार व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
रावणवाडी येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षणाच्या आपदा मित्र सखी यांचे प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, डॉ. राजकुमार गुप्ता, डॉ. ब्राम्हणकर, डॉ. नितीन तुरस्कर, प्रशिक्षक किशोर सोनटक्के, संजयकुमार पटले यावेळी उपस्थित होते.
या पाच दिवसीय निवासी प्रशिक्षणामध्ये समीर गणवीर, अग्निशमन अधिकारी यांनी अग्निशमन प्रात्याक्षिक दिले. रोड सेफ्टीबाबत जनजागृती व माहिती श्री भूषण कोळी, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा यांनी दिली. बोट कशी चालवायची यांचे प्रशिक्षण जिल्हा शोध व बचाव पथकाने दिले. विषबाधा झाल्यास काय करावे तसेच प्राथमिक उपचार, सी. पी. आर. याची माहिती भंडारा रेडक्रॉस सोसायटी चे डॉ. नितीन तूरस्कर, श्याम लढढा यांनी दिली. पूर, भूकंप इत्यादी आल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांना आपत्तीच्या काळामध्ये आपदा मित्र व सखी यांची मदत होणार आहे.