क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार

 

Ø आदिवासी प्रशिक्षण केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 

चंद्रपूर, दि. 03 : आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीचे औचित्य साधून येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी मार्गदर्शन केंद्राच्या प्रमुख तथा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावतीच्या प्राचार्य श्रीमती दहाट, प्रशिक्षण संस्थेचे विजय गराटे, संजय राठोड व केंद्रातील शिक्षक मंगेश गौरकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

मार्गदर्शन करतांना प्राचार्या दहाट यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उमेदवारांनी त्याप्रमाणे सातत्य ठेवावे, स्वतःचे ध्येय ठरवून पुढील वाटचाल करावी व अभ्यास करतांना विविधता ठेवावी म्हणजे यश गाठणे शक्य होईल, असे मार्गदर्शन केले. तर भाग्यश्री वाघमारे यांनी, उमेदवारांनी जिद्द व चिकाटीने योजनापूर्वक अभ्यास करावा व परीक्षेला सामोरे जाऊन यश प्राप्त करावे, असे सांगितले

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यापूर्वीच्या सत्रातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व नोकरीस लागलेल्या तलाठी मिनाक्षी वासुदेव श्रीरामे, विद्या मारोती केदार, अधिक्षिका अनुदानित आश्रमशाळा जानाळा संध्या लटारु गेडाम या महिला उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

 

नोकरीस लागलेल्या उमेदवारांनी मनोगत व्यक्त करतांना या केंद्रातील प्रशिक्षणामूळे नोकरीमध्ये यश मिळाले असे सांगून केंद्राचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व प्रशिक्षणार्थीचें सहकार्य लाभले.