तीन दिवसीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन
गडचिरोली, दि.01: जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थामधील निराधार मुलांसाठी दिनांक 10 जानेवारी 2023 ला अहिल्यादेवी बालसदन घोट या ठिकाणी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व मुले व प्राधान्याने बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांबाबत बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी 36 जिल्ह्यामध्ये व 6 विभागीयस्तरावर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी चाचा नेहरु बाल महोत्सव अहिल्यादेवी बालगृह घोट, ता. चामोर्शी येथे दिनांक 10 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान तीन दिवसीय चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
सदर बाल महोत्सवाचे उद्घाटन/ अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी संजय मीना व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय उपआयुक्त महिला व बालविकास विभाग, नागपूर, अर्पणा कोल्हे उपस्थित राहणार आहेत. सदर बाल महोत्सवात शासकीय संस्था व स्वयंसेवी संस्था मधील प्रवेशीत मुली व स्थानिक शाळामधील मुली यांना सहभाग करुन त्यांच्यासाठी कब्बडी स्पर्धा, 100 मीटर धावणे, निबंध, रांगोळी, चित्रकला, घोषवाक्य, सामान्य ज्ञान, एकल नृत्य, सामुहिक नृत्य, एकल गायन, सामुहिक गायन, नकला इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तीन दिवसीय चालणाऱ्या या महोत्सवाचा समारोप 12 जानेवारी 2023 रोजी होणार असून या कार्यक्रमातच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी दिली आहे.