रविकिरणच्या बालनाट्य स्पर्धेत “ध्येय्यधुंद” सर्वोत्कृष्ट

रविकिरणच्या बालनाट्य स्पर्धेत “ध्येय्यधुंद” सर्वोत्कृष्ट

 

नुकतीच रविकिरण संस्थेची ३६वी बालनाट्य स्पर्धा रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला या वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. वेळेअभावी उशिरा आलेल्या काही प्रवेशिका नाईलाजाने नाकाराव्या लागल्या. या स्पर्धेचे उद्घाटन पु. ल. अकादमीचे डायरेक्टर, श्री. संतोष रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

 

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नागेश नामदेव वांद्रे यांनी केले. श्री वांद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षीची स्पर्धा डॉ. के. एम. एस. शिरोडकर हायस्कुलचे शिक्षक स्मृतिगत ज्योतीराम कदम सर यांच्या नावे घेतल्याचे सांगताना अशा प्रकारची स्पर्धा रविकिरण मंडळाने घ्यावी असे १९८४ साली कदमसरांनीच सुचविल्याचे सांगितले. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्योतीराम कदम सरांनी लिहिलेल्या बालनाट्यांची पुस्तके मंडळातर्फे प्रत्येक शाळा/संस्था प्रतिनिधींना मोफत वाटण्यात आली. रवींद्र नाट्य मंदिराचे लाईट्मन, गेटकिपर, नेपथ्य व्यवस्थापक यांच्या हस्ते या पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आले

 

 

 

या स्पर्धेच्या निमित्ताने अशा निवृत्त शिक्षकांच्या कार्याची नोंद घेतली जाते. आपल्या सेवेमध्ये असताना जे शिक्षकांनी बालनाट्याचे लेखन/दिग्दर्शन करून स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्यांचा यथोचित सन्मान करण्याची रविकिरणची परंपरा आहे. या वर्षी नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कारकिर्दीत आगळी-वेगळी म्हणजेच विज्ञाननिष्ठ बालनाटिका रविकिरणच्या रंगमंचावरती सादर करण्यात आली होती. सत्काराला उत्तर देताना श्री दीपक कुलकर्णी म्हणाले एवढं मोठं व्यासपीठ मुलांना उपलब्ध करून देणारी संस्था फक्त रविकिरणच. तसंच साडेतीन दशकं हा उपक्रम चालू ठेवणं आणि तितक्याच उत्साहाने तो साजरा करणं हे केवळ कलाकार निर्मिती नसून या मागे एक सुसंस्कारी समाज आणि सुजाण प्रेक्षक निर्माण करण्याचा यज्ञच रविकिरणने सूरु केला असे ते म्हणाले.

 

 

 

या स्पर्धेच्या निमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे विलास भिकाजी येरम यांचा व मंडळाचे सभासद प्रमोद राणे यांची बेस्ट कामगार को. ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच संस्थेचे सभासद श्री महेंद्र पवार यांची भारत सरकारच्या भारतीय संस्कृतीक परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मानपत्र-शाल-श्रीफळ देऊन प्रदीप मुळ्ये व स्पर्धेचे प्रायोजक एसबीआय लाईफच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रातिनिधिक म्हणून बोलताना महेंद्र पवार म्हणाले हे मानपत्र नव्हे तर ऋणपत्र आहे. आजवरच्या कारकिर्दीला केवळ रविकिरण परिवाराचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही घडू शकलो आहोत.

 

 

 

या स्पर्धेच्या निम्मिताने प्रकाशित होणाऱ्या “स्मृतिपर्ण” या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणे श्री प्रदीप मुळ्ये यांच्या हस्ते केले गेले. या स्मरणिकेत ज्येष्ठ नाट्य-समीक्षक श्री कमलाकर नाडकर्णी व मंडळाचे कार्यकारी सदस्य श्री महेंद्र पवार ज्योतीराम कदम सरांच्या बालनाट्य क्षेत्रातील कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

 

 

 

जेष्ठ अभिनेत्री विमल म्हात्रे, डॉ. माधुरी विनायक गवांदे, धनंजय सरदेशपांडे यांनी या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम पहिले. या कार्यक्रमाला माजी-महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन अशोक परब, नितीन नगरकर व कु. सोहम पवार यांनी केले. खजिनदार गजानन राणे यांनी सगळ्यांचे आभार मानले.