बल्लारपूर रेल्वे दुर्घटना : मृतक कुटुंबियांसाठी पाच लाखांचे अर्थसहाय्य जिल्हाधिका-यांच्या खात्यात वर्ग
Ø पालकमंत्र्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीने दखल
चंद्रपूर, दि. 30 : बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर पादचारी पुल कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्या कुंटुबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे जखमींवर योग्य उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांना पत्र पाठवून पाच लाख रुपये खात्यात वर्ग केल्याचे कळविले आहे.
रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला व सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रु.चे अर्थसहाय्य मृतकेच्या कुटुंबियांना जाहीर केले व 30 नोव्हेंबर रोजी सदर अर्थसहाय्य जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.