एकोना खाण बाधितांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा Ø पालकमंत्र्यांचे कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाला निर्देश

एकोना खाण बाधितांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा

Ø पालकमंत्र्यांचे कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाला निर्देश

चंद्रपूर, दि. 29 : वरोरा तालुक्यातील एकोना खाण व्यवस्थापनाबद्दल परिसरातील गावक-यांच्या अनेक तक्रारी आहेत. स्थानिकांना रोजगार, रस्त्यांची दुरुस्ती, कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) परिसराचा विकास अशा अनेक प्रश्नांसाठी 24 नोव्हेंबर पासून गावक-यांनी जनआंदोलन पुकारले आहे. गावक-यांच्या या मागण्या त्यांच्या हक्काच्या आहे. त्यामुळे एकोना कंपनीच्या व्यवस्थापनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन गावक-यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्या, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

नियोजन भवन येथे एकोना बाधितांच्या संदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाशी आणि गावक-यांशी चर्चा करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, एकोनाचे सरपंच गणेश चवले, पाटाडाचे सरपंच विजेंद्र वानखेडे, वनोदाच्या सरपंच शालू उताणे, उपसरपंच सचिन बुरडकर, चंद्रकला नरसिंगे, योगिता पिंपळशेंडे व गावकरी उपस्थित होते.

 

एकोना खाणीमुळे बाधित झालेल्या गावक-यांचे प्रश्न अतिशय रास्त आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परिसरातील 24 ग्रामपंचायतींची बैठक घ्यावी. एवढेच नाही तर जिल्ह्यात विविध खाण परिसरात असलेले सर्व रस्ते शोधावे. या रस्त्यासांठी डब्ल्यूसीएल, सीएसआर फंड, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच खनीज विकास प्रतिष्ठानमधून निधी दिला जाईल. ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घराला तडा गेल्या आहेत. याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्रयस्त यंत्रणेद्वारे (एनआयटी) तडा गेलेल्या घरांचे सर्व्हेक्षण करावे. याचा अहवाल 30 दिवसात सादर करावा.

 

कपंनीमध्ये वाहतूक करण्यासाठी ट्रक कंत्राटदारकाकडे स्थानिकांचे ट्रक लावावे. ट्रक कंपन्यांशी बोलणी करून सवलतीच्या दरात ट्रक उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच याबाबत स्थानिक नागरिकांना चालकाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. खाणीमध्ये सद्यस्थितीत सुरू असलेल्या ट्रकची आरटीओने तपासणी करावी. वाहतूक करणा-या गाड्यांवरील ताडपत्री अतिशय चांगली असली पाहिजे. कंपनीने दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात. याबाबत ग्रामपंचायतीने त्वरीत प्रस्ताव देऊन त्याच पाठपुरावा करावा.

 

सीएसआर फंडमधून विकासकामे करण्यासाठी सरपंचांकडून कामाची यादी घ्यावी. यात प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी आदींचा समावेश असावा. या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्या कुटुंबाच्या सदस्यांना कंपनीने नोकरी दिलीच पाहिजे. परिसरातील अशा तरुण – तरुणी शोधून त्यांची यादी तयार करावी. सध्या खाणीमध्ये जे कार्यरत आहेत, ते स्थानिक आहेत की नाही, त्यांच्याकडे स्थानिक परिसरातील राशनकार्ड आहे की नाही, ते तपासावे. एवढेच नाही तर एकोना खाणीमध्ये रोजगाराची नियुक्ती देणा-या कंपन्यांची जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी. परिसरातील मुलींच्या शिक्षणासाठी मानव विकास योजनेतून चार बसेस देण्याचे नियोजन करावे. परिसरातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या उत्पादनाच्या मशीन कंपनीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

 

यावेळी एकोना, पाटाडा, वनोदा व परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.