यापूर्वी लाभ मिळालेल्यांना सुद्धा ई – केवायसी बंधनकारक
अन्यथा पीएम किसान सन्मान निधीपासून राहावे लागेल वंचित
Ø ऑनलाइन केवायसी करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर.
चंद्रपूर, दि. 4 सप्टेंबर : पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वच लाभार्थ्यांना ऑनलाईन केवायसी करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ज्यांना सन्मान निधीचे हप्ते मिळाले असतील, त्यांनी सुद्धा ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा करणे गरजेचे आहे. अन्यथा पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. ऑनलाइन केवायसी करण्याची मुदत आता 7 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतक-यांनी त्वरीत ऑनलाईन केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
यापूर्वी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाल्यामुळे ई-केवायसी करण्याची गरज नाही, असा गैरसमज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनासुद्धा ई-केवायसी पुन्हा करणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित लाभार्थ्यांना सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन केवायसी त्वरित करून घ्यावी. सदर योजना ओटीपी वर आधारित असून लाभार्थी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक पीएम किसानचे वेब पोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरशी सलग्न असावा.
ऑनलाईन केवायसी करीता राबविण्यात येणारी प्रक्रिया :
ओटीपी मोड (मोबाईलद्वारे / संगणकाद्वारे) : पीएम किसानच्या अधिकृत वेब पेजला https://pmkisan.gov.in/ भेट द्या. वेब पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ई-केवायसी पर्यायाला क्लिक करा. स्वतःचा आधारकार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून सर्च करा. आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका आणि क्लिक करा. ओटीपी आल्यानंतर संबंधित जागेवर ओटीपी भरा व सबमीट करा.
बायोमेट्रीक मोड ( महा ई सेवा केंद्रातून ) : नजीकच्या नागरी सेवा केंद्रावर (सीएससी) जाऊन प्रक्रिया करता येईल. तसेच ई-सेवा केंद्रावर जातांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जा.
वरीलप्रमाणे ई – केवायसी पूर्ण करा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.