आपल्या स्वातंत्र्याचा सन्मान आवश्यक – आयुक्त राजेश मोहीते
मनपात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी सोहळा
चंद्रपूर १५ ऑगस्ट – आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचे मोठे योगदान आहे. तसेच आजचा दिवस हा ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली त्या थोर महापुरुषांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसल्याने आपल्या स्वातंत्र्याचा सन्मान करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आयुक्त राजेश मोहीते यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे,सहायक आयुक्त विद्या पाटील,शहर अभियंता महेश बारई यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सर्व प्रथम आयुक्त राजेश मोहीते यांच्या हस्ते गांधी चौकस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयुक्तांनी मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व जटपुरा गेट येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हुतात्मा स्मारक येथे भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने शासनातर्फे घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा उंचावला आहे. या उपक्रमात नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महत्त्वाच्या ऐतिहासिक इमारतींना, कार्यालयांना मनपातर्फे सजविण्यात आले तसेच नागरीकांना सहभागी करून घेण्यास मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.