बाईक रॅलीतून साकारला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो महिला व बालविकास विभागाचे नियोजन
भंडारा, दि. 12 :जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने दि. 12 ऑगस्ट रोजी “हर घर तिरंगा” या संकल्पनेच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषद भंडारा येथून महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीतून खात रोड परिसरातील मैदानावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सत्वाचा पंचाहत्तरवा लोगो साकारण्यात आला. जिल्हा परिषद भंडाराच्या आवारात जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी शुभांगी सुनीलजी मेंढे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपजी चौधरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, जिल्हा परिषद भंडाराच्या महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनिषा कुरसुंगे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गौरव तुरकर, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्यासह कोब्रा बटालियनचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास प्रकल्प तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तिरंगा ध्वजाच्या केसरी, पांढरा व हिरवा या रंगांनी महिलांनी गणवेश परिधान करून रॅलीला आकर्षक स्वरुप दिले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला बालविकास विभाग जिल्हा परिषद भंडारा, महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा व उमेदच्या अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.