आजपासून सुरू होणाऱ्या हर घर तिरंगा कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी
· ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घर, कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकवा
भंडारा, दि. 12 : गेल्या 15 दिवसांपासून जिल्हयात ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाविषयी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. प्रत्यक्ष हा कार्यक्रम उद्या दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. हर घर तिरंगा सोबतच जिल्हयातील कार्यालये व ऐतिहासीक वास्तुंना रोषणाई करावी. या वर्षीचा स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या गौरवाचा इतिहास सांगणारा असल्याने तो मोठ्या उत्साहात साजरा करावा असे श्री. कदम यांनी सांगितले. या कार्यक्रमात जिल्हाभरात साधारण 3 लाख घरांवर तिरंगा फडकविण्याचे नियोजन असून त्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांनी हर घर तिरंगा कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
नागरिकांनी स्वयंप्रेरणेतून आपल्या घरावर राष्ट्रध्वज उभारुन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच 75 वर्षाच्या गौरवशाली परंपरेला, सुधारणांना आपल्या देशाच्या सामर्थ्याला, जनतेपुढे मांडणे, यासाठी प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. राज्यात हाच उपक्रम आता ‘हर घर तिरंगा ‘ या नावाने राबविण्यात येणार आहे. या अभियानात योग्य आकाराचे कापडाचे तिरंगा ध्वज, सर्वसामान्यांना मिळेल अशी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मात्र प्रत्येक नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आपल्या घरावर आपला अभिमान असणारा तिरंगा डौलाने फडकेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सामान्य नागरिकांना केले आहे.
राष्ट्रध्वज उभारणीसाठी प्रत्येक सामान्य माणसाला योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी, कापडापासून बनविलेला झेंडा असेल याची खातरजमा करावी. राष्ट्रध्वज मुबलक प्रमाणात सामान्य नागरिकांना उपलब्ध होईल यासाठीची खात्री बाळगण्याचेही त्यांनी आवाहन केले. राष्ट्रध्वजाबद्दल ध्वज संहिता असून त्याचे पालन झाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याबाबतची काळजी घेण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. आपल्या घरावर तिरंगा लावल्याची छायाचित्रे, चित्रफीत, ध्वनिमुद्रण केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या अमृत महोत्सव डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे त्यांनी सांगितले.
हर घर तिरंगा नावाचे ॲप प्रशासनाने तयार केले असून नागरिकांनी तिरंग्या सोबत घेतलेल्या सेल्फी त्या ॲपवर अपलोड करण्यात याव्या. हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात व शाळेत जनजागृतीवर कार्यक्रम घेण्यात आले आहे.
राष्ट्रप्रेमाच प्रतीक असलेला तिरंगा हा सर्व नागरिकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट जसे व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर यावर डीपीला व स्टेटस म्हणून ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.कदम यांनी केले आहे.