गॅस्ट्रो सदृश्य परिस्थिती असलेल्या गावांमध्ये तात्काळ कार्यवाही करण्याच्या सीईओंच्या सुचना
Ø ग्रामपंचायत व पंचायत समितीला निर्देश
चंद्रपूर, दि. 9 ऑगस्ट : राजुरा तालुक्यातील देवाडा व काही गावांमध्ये गॅस्ट्रोची लागण झाली असता तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही रुग्णांचे 7 स्टूल सॅम्पल प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. पाईपलाईन व वॉल गळतीमुळे पाणी दूषित झाले असून या गावांमध्ये अतिसार आजाराचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे अशा गैस्ट्रो सदृश्य परिस्थिती असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिल्या आहे.
सदर कार्यवाहीबाबत गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविणे, ब्लिचिंग पावडरची तपासणी, ग्रामपंचायत स्तरावर क्लोरीनेशन व साफसफाई करण्याच्या सूचना, शेणखते व उकिरडे गावाच्या हद्दीपासून 100 मीटर अंतरावर स्थानांतरित करणे तसेच पाण्याच्या टाकीखाली मुख्य व्हॉल्वमध्ये कोणत्याही प्रकारची गळती असल्यास त्वरित बदलविण्यात यावे, अशा सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी दिल्या.
गत आठवड्यात देवाडा गावामध्ये एकूण 78 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. टेंभुरवाही येथे 35 जणांना गॅस्ट्रोची लागण तर एक मृत्यू, सोंडो या गावांमध्ये 25 जणांना गॅस्ट्रोची लागण तर सिंदेश्वर या गावामध्ये एकूण 70 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गॅस्ट्रोवर प्रतिबंधात्मक उपाय :
नागरिकांनी पाणी उकळून गार केलेले अथवा मेडिक्लोरचा (जीवनड्रॉप) वापर केलेले प्यावे. स्वयंपाक करण्यापूर्वी, जेवायला वाढतांना किंवा जेवतांना हात स्वच्छ धुवावेत. अन्न नीट झाकून ठेवावे, ताजे अन्न खावे, शिळे अन्न खाणे टाळावेत. शौचालयावरून आल्यावर, बाळाची शी धुतल्यावर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावेत. शौचासाठी शौचालयाचा वापर करावा. पाण्याच्या स्त्रोताजवळ शौचालयास बसू नये. घरात कोणाला उलट्या, जुलाब होत असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. जुलाब होत असतांना देखील 6 महिन्याखालील बाळाला अंगावरील दूध पाजणे थांबवू नका. रुग्ण दवाखान्यात पोहचेपर्यंत ओ.आर.एस द्रावण योग्य प्रमाणात पाजत रहा. लहान मुले व गरोदर माता आणि वृद्ध लोकांची विशेष काळजी घ्या. त्यांना साथ संपेपर्यंत उकळून गार केलेले पाणी पिण्यासाठी द्या, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे.