महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत
वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक
परिचारिकांनी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. 31 : वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असून परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या आंदोलनाबाबत आणि संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत मंत्रालयात चर्चा केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परिचारिकांची भरती होण्याबरोबरच एकूण 12 मागण्या नेमक्या काय आहेत याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत 12 मागण्यांबाबत तसेच परिचारिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक या सर्व मागण्यांचा अभ्यास करतील असे सांगितले. तसेच काही मागण्यांबाबत इतर विभागाचे अभिप्राय घेणेही आवश्यक असल्याने ते लवकरात लवकर घेतले जातील असे नमूद केले. येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी श्री.देशमुख यांनी सांगितले.