डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी
अर्ज करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166
भंडारा दि 4 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहायक आयुक्त सुकेशीनी तेलगोटे यांनी दिली.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही विषयातील प्रवेश प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. एल. एल. बी, बी. एड. यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या फेरी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे सीईटी विभागाने कळवले असून त्याअनुषंगाने वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजना यातील लाभांपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये. यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आहे. तरी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दहावी, बारावी, पदवी परीक्षेचे गुणपत्रक, बँक खाते, आधार संलग्न केल्याचा पुरावा, स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थी जिथे राहतो त्याचा पुरावा व भाडे करारनामा, महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र यासह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हिल लाईन जिल्हा परिषद चौक, भंडारा या कार्यालयात 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावे अर्जाचा नमुना कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे. विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी केले आहे.