महाकाली मंदिरात भाविकांना मिळणार कोरोना लस ; लस न घेतलेल्या भाविकांना दर्शनास प्रतिबंध
चंद्रपूर, ता. ७ : गुरुवार, ता. सात ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे खुली झाली असून, नवरात्रीनिमित्त महाकाली मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मंदिरात प्रवेश करताना भक्तांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या भाविकांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी महाकाली मंदिर परिसरात लसीकरण होणार आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखून धरण्यासाठी कोरोना लसीकरण अत्यावश्यक आहे. चंद्रपूर शहरातील एकूण पात्र नागरिकांपैकी सद्यस्थितीत ५५ टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे. या लसीकरणाच्या उपक्रमाला लोकसहभाग मिळावा, यासाठी व्यापारी मंडळ, किरकोळ विक्रेते, सेवा पुरवठादार यांची नोंदणी केली जात आहे. चंद्रपूर शहरातील कोरोना लसीकरणाचा टप्पा वाढविण्याच्या दृष्टीने मनपातर्फे खासगी रुग्णालये, सामाजिक भवन, मंदिर येथेही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच लसीकरण आपल्या दारी उपक्रम सुरु असून, मागील १० दिवसांत ३०० हून दिव्यांग, वयोवृद्ध व अंथरुणास खिळलेले व्यक्तीनी लस घेतली.
कोरोनामुळे दीड वर्षापासून शाळा, धार्मिक स्थळे, सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमांवर बंदी आहे. परंतु, हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यात येत आहे. ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे सुरू झालीत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरनगरीची आराध्य दैवत माता महाकाली देवीच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात येत आहेत. मंदिरात प्रवेश करताना भक्तांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या भाविकांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी महाकाली मंदिर परिसरात लसीकरण होणार आहे. सकाळी सात ते सायकांळपर्यंत लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या मार्फतीने भाविकांना टोकन देण्यात येणार आहे.
सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी 6 फुटाचे अंतर राखावे. फेस कव्हर, मास्कचा वापर अनिवार्य असेल. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. नागरिकांना परिसरात थुंकण्यास सक्त मनाई असून थुंकणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. धार्मिक स्थळे तसेच परिसरात घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकांनी पालन करणे अभिप्रेत आहे. कोविड-19 संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अशा परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक असल्याच्या सूचना मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी दिल्या आहेत.