धार्मिक स्थळे / ठिकाणांवर कोविड-19 चा प्रसार रोखण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी Ø धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे 7 ऑक्टोबर पासून सुरु करण्यास परवानगी
धार्मिक स्थळे / ठिकाणांवर कोविड-19 चा प्रसार रोखण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
Ø धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे 7 ऑक्टोबर पासून सुरु करण्यास परवानगी
चंद्रपूर दि. 30 सप्टेंबर : धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे येथे मोठ्या संख्येने लोक येतात. कोविड-19 संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अशा परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हयातील धार्मिक स्थळासंदर्भात सुधारीत मार्गदर्शक सुचना, निर्देश चंद्रपूर जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात दि. 7 ऑक्टोंबर 2021 पासून लागू करण्यात येत आहे. सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांनी सदर आदेशात नमूद केलेल्या सुधारणांचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये लोकांसाठी धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील. केवळ कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी असेल. 65 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती, जटील रोग, व्याधीग्रस्त असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. धार्मिक संस्था व्यवस्थापन समिती यांनी सदर उपाययोजनांचे अधीन राहून कामे करणे आवश्यक आहे.
सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी 6 फुटाचे अंतर राखावे. फेस कव्हर, मास्कचा वापर अनिवार्य असेल. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच राज्य व जिल्हा हेल्पलाइन क्रमांकावर याबाबत सूचना द्यावी. नागरिकांना परीसरात थुकंण्यास सक्त मनाई असून थुकंणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. धार्मिक स्थळे तसेच परिसरात घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकांनी पालन करणे अभिप्रेत आहे.
सर्व धार्मिक स्थळे, संस्था यांनी प्रवेशद्वारावर हाताची स्वच्छता करण्यास्तव सॅनिटायझर डिस्पेंसर, साबण-पाणी तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच परिसरात परवानगी असेल. मास्क लावलेल्या व्यक्तींनाच धार्मिक स्थळ परिसरात प्रवेश देण्यात यावा. धार्मिक स्थळांचे क्षेत्रफळ, संरचना, वायुविजन इत्यादी घटकांच्या आधारे एकावेळी प्रवेश देण्यात येणाऱ्या व्यक्तींची संख्या निर्धारित करावी. याबाबत संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी, प्रमुखांनी स्थानिक प्राधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावा.
वाहनतळ, धार्मिक स्थळाच्या बाहेरील जागा, प्रवेशद्वारे येथे गर्दीचे योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच धार्मिक स्थळ, संस्थाच्या आवारातील दुकाने, आस्थापना, उपाहारगृहे, टपऱ्या इ. स्थळी सामाजिक अंतराचे पालन होईल या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात. प्रवेशासाठी रांगेत उभे असतांना प्रत्येक वेळी किमान 6 फूट शारीरिक अंतर ठेवणे अनिवार्य असेल. सदर बाबीकरिता धार्मिक स्थळे व संस्था व्यवस्थापन जबाबदार राहील.
पुरेसे शारीरिक अंतर राखले जाईल या अनुषंगाने बैठक व्यवस्था करावी. मूर्ती तसेच पवित्र पुस्तके इत्यादींना स्पर्श करण्याची परवानगी नसेल. धार्मिक संमेलन परिषदांवर बंदी कायम राहील. कोविड-19 संक्रमणाचा प्रसार होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, शक्य तितके रेकॉर्ड केलेले भक्ती संगीत, गाणी वाजवली जावीत. प्रत्यक्ष गायन किंवा गायन गटांना भक्तीगीत,संगीत गाण्याची परवानगी देऊ नये.
प्रार्थना करतांना सार्वजनिक चटई टाळावी, भक्तांनी स्वतःची चटई आणावी. धार्मिक स्थळी प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इ. सारखे धार्मिक विधी करू नये. धार्मिक स्थळांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनाने करावी. तसेच मास्क, टिशू यांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. धार्मिक स्थळी काम करणारे कामगार, कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील. तसेच दर्शनार्थीच्या संपर्कात येणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांनी साप्ताहिक कोविड चाचणी करून घेणे गरजेचे राहील. स्थानिक प्राधिकरण, पोलिस विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने प्रवेश संख्या, जागा व अंतर इ. बाबतचे नियोजन करण्याची कार्यवाही संबंधित धार्मिक स्थळांनी करावी.धार्मिक स्थळाच्या आवारात संशयित किंवा संसर्गित रुग्ण आढळला असेल तर संबंधित व्यक्तीचे तातडीने विलगीकरण करण्यात यावे. तसेच जवळच्या वैद्यकीय रुग्णालयात तात्काळ कळवावे.
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 7 ऑक्टोबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हादंडाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.