मध्यस्ती प्रक्रियेमध्ये आपसी समझोत्याद्वारे वाद मिटवावे – अधिवक्ता भास्कर दिवसे
चंद्रपूर दि.11 ऑगस्ट: मध्यस्ती प्रक्रियेमध्ये आपसी समझोत्याद्वारे वाद मिटवून उभय पक्षांसाठी जिंकल्याची भावना निर्माण होते व भविष्यकालीन वाद टाळले जातात, असे मत मध्यस्थ अधिवक्ता भास्कर दिवसे यांनी व्यक्त केले.
औद्योगिक व कामगार न्यायालय चंद्रपूर येथे आयोजित मध्यस्ती जनजागृती कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. यावेळी कामगार न्यायालयाचे न्यायाधीश रूपाली मेटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किरण जाधव, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री. उराडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी अॅड. दिवसे यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे सांगून मध्यस्थी प्रक्रियेची कार्यवाही, महत्व व फायदे नमूद केले. तर वेळ, पैसा व श्रम वाचविण्यासाठी सदर प्रक्रियेचा जास्तीत जास्त अवलंब करण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संचालन ॲङ दुर्गे यांनी केले. यावेळी विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांची उपस्थिती होती.