तिस-या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने सज्ज राहावे
– विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे
Ø कोव्हीड उपाययोजनेसह इतरही विषयांचा आढावा
चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गाफिल राहून चालणार नाही. तज्ज्ञांच्या मते तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सज्ज राहावे, अशा सुचना नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कोव्हीड विषयक आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे, मनपा अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवंर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.
तिस-या लाटेत रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, असे सांगून विभागीय आयुक्त लवंगारे म्हणाल्या, जिल्हा क्रीडा संकुल व इतर ठिकाणी अतिरिक्त बेडची व्यवस्था होऊ शकते. जिल्ह्याची ऑक्सीजनची गरज लक्षात घेऊन त्वरीत ऑक्सीजन प्लाँटची उभारणी, मुबलक औषधीसाठा तयार ठेवावा. मनुष्यबळाची कमतरता सर्वत्रच आहे. ही समस्या स्थानिक स्तरावरच निकाली काढावी लागेल. लसीकरणाबाबत आयुक्त म्हणाल्या, चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लस साठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी जिल्ह्याची कोव्हीड विषयक माहिती जाणून घेतली. तसेच सर्व उपविभागीय अधिका-यांकडून महसूल विषयक व सर्व नगर पालिकेच्या मुख्याधिका-यांकडून शहरी भागातील योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
बैठकीला उपविभागीय अधिकारी सर्वश्री क्रांती डोंबे, संपत खलाटे, संजय ढवळे, प्रकाश संकपाळ, यांच्यासह संबंधित तहसीलदार व न.प.मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.